पंढरपूर (सोलापूर) - पुणे आणि सातारा जिल्ह्यातील धरणातून भीमा आणि नीरा नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे. उजनी धरणातील पाणीसाठा 42 टक्के पेक्षा जास्त झाला आहे. वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 42 हजार क्यूसेक करण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमा आणि नीरा नदीकाठी असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पंढरपूर नगरपालिकेने शहरातील पूर रेषेतील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग मोठा आहे. रविवार सकाळी 42 हजार क्यूसेक पाणी सोडले गेले. यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर ते सोलापूर मार्गावरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा पत्रातील कुंडलिकाच्या मंदिरासह लहान मोठे मंदिरही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पंढरपूर नगरपालिका प्रशासन पूररेषेकडे लक्ष ठेऊन आहे. तर पुणे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कायम आहे. उजनी तसेच वीर धरणातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने पूरपरिस्थिती होण्याची शक्यता आहे.