सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील विहाळ गावात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे विहाळ गाव पाणीदार झाले आहे. तसेच परतीच्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा प्रत्यय करमाळा-राशिन रोडवरील विहाळ नाळेवस्तीत आला. नाळेवस्तीतील हातपंपाला न हापसता आपोआप हातपंपातून पाणी वाहत आहे. परिसरात हा हातपंपत कुतहलाचा विषय बनला आहे.
करमाळा तालुक्यात मोसमी पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी एकाचवेळी कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ अनुभवला. परतीच्या पावसाने तसेच जलसंधारणाची कामांमुळे पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. करमाळा-कोर्टी रस्त्यावर नाळेवस्ती येथील हातपंपाला आपोआप पाणी येत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तहान हा हातपंप भागवत असून हा कुतुहलाचा विषय बनला आहे.
विहाळ हा दुष्काळी भाग असुन उन्हाळ्यामध्ये या गावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. मा६, परतीच्या पावसाने जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाळेवस्ती येथील हातपंपाला न हापसताच पाणी येत आहे. २४ तास या हातपंपातून पाणी वाहत आहे. महत्वाचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये याच हातपंपाला खूप वेळा हापसावे लागत होते.
विहाळ येथे जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणात झाले आहेत. डोंगरामध्ये २० ते २५ नाले आहेत. ओढ्यामध्ये ५ बंधारे आहेत. त्याचबरोबर मोठा तलाव आहे. पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये गावाने सहभाग घेतला होता. यामुळे पाण्याचा साठा जास्त प्रमाणात झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. जर अशाप्रकारचे जलसंधारणाचे कामे प्रत्येक गावात झाली तर प्रत्येक गाव पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही - सुदाम कुंडलिक नाळे, नागरिक, नाळे वस्ती विहाळ