पंढरपूर - दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. विठ्ठल मंदिरात सकाळी सहा वाजल्यापासून ऑनलाइन बुकींग केलेल्या भाविकांना विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन आठ महिन्यानंतर झाले. या मंदिरात विठ्ठल मंदिर समितीकडून एक हजार भाविकांना दर्शन होणार आहे. मात्र, ज्या भाविकांना ऑनलाइन बुकींग न झाल्यामुळे दर्शन घेता आले नाहीत, त्यांना नामदेव पायरीवर दर्शन घेत गावी परतावे लागत आहे. चंद्रभागा नदी स्नान करून वारकरी व भक्तांनी विठ्ठलाचे दर्शन घेत विठ्ठल नामाचा जयघोष केला. विठ्ठलाचे दर्शन घेत भक्तांकडून विठ्ठलाला राज्य तसेच देशातून कोरोनाचे की संकट टळू दे, असे साकडे घालण्यात आले
काही संघटनांनी केला जल्लोष -
विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावी, या मागणीसाठी वारकरी सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते. तसेच संबंध वारकरी संप्रदायाच्यावतीने महाराज मंडळींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंदिर उघडण्यासाठी भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नामदेव पायारी येथे जल्लोष परत मंदिर खुल्या केल्याबद्दल घोषणा देण्यात आल्या.
मंदिर प्रशासनाकडून कोरोनासंबंधित खबरदारी -
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यात राज्यातील धार्मिक स्थळे सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात आली होते. 14 नोव्हेंबरला राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली. त्यानुसार पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुले करण्यात आले, मात्र प्रशासनाकडून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन न देता मुखदर्शनाची सोय भाविकांसाठी केली होती, विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाय करून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले केले.
चेन्नईतील भक्ताला मिळाला प्रथम दर्शनाचा मान -
विठ्ठल मंदिर सकाळी सहा वाजता दर्शनासाठी आल्यानंतर चेन्नई येथील भाविकाने प्रथम दर्शन घेण्याचा मान मिळाला, त्यानंतर सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करतात, ज्या भाविकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. त्या भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले, एका तासामध्ये 58 भक्तांनी विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले.
थर्मल स्क्रिनींग आणि निर्जंतुकीकरण -
विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्या दृष्टीने मंदिर समितीने मंदिराच्या स्वच्छतेसह सॅनिटाईझ करत सर्वतोपरी तयारी केली आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात आले आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिरात येणार्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणार्या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आनंद -
कोरोनागेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. कोरोना परिस्थितीमुळे सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला. विठ्ठल मंदिर खुले झाल्यामुळे चुरमुरे, बत्तासे, खेळणी, हॉटेल, छोटे व्यापारी, माळ विक्रेते यांनी यांनी आनंद व्यक्त केला. पंढरी भाविकांची झालेली गर्दी पाहून व्यापाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली. विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांनी फुलून गेला होता.
हेही वाचा - आजपासून भाविकांसाठी राज्यातील मंदिरे होणार खुली!