बार्शी - बार्शीत 505 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दहा दिवसापासून रुग्णसंख्या वाढत असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक नियमावली जारी करण्यात आली होती. असे असतानाही वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यात यश मिळालेले नाही. अशातच गुरुवारपासून संबंध राज्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, पहिल्या दिवशी ना नागरिकांनी गांभीर्याने घेतले ना पोलीस प्रशासनाने. त्यामुळे बाजारपेठेतील अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. पण बाजारपेठेतील नागरिकांची गर्दी ही कायम होती.
केवळ 38 ऑक्सिजन बेड शिल्लक-
शहरातील पांडे चौक, बसस्थानक, भोसले चौक या ठिकाणी नागरिकांची वर्दळ होती. गतवर्षी लॉकडाऊनच्या दरम्यान कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, सध्याची नियमावलीचे पालन करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लागू करण्यात आलेल्या जमावबंदीचा कोरोनाची साखळी तोडण्यास कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही.
शहरात 8 कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये केवळ 38 ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. तरी देखील जमावबंदीच्या पहिल्या दिवसापासूनच बार्शी शहरात सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ होती.