सोलापूर - राज्य शासनाने आंतरजिल्हा एस. टी. बसची आजपासून सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. चार महिन्यांच्या अवकाशानंतर हक्काची लालपरी धावू लागली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सोलापूर एस. टी. आगारात आनंद साजरा करत एसटीची जल्लोषात रवानगी केली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 12 ऑगस्टला महाराष्ट्रासह राज्यभरात प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एस. टी. स्टँड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक चालू करावे या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनास यश मिळाले आहे, असे आनंद चंदनशिवे यांनी माध्यमासमोर आपले मत व्यक्त करताना सांगितले.
ड्रायव्हर व कंडक्टर यांचा फेटा बांधून सत्कार
गुरुवारी सकाळी 7 वाजता एसटी आगारातून सोलापूर ते स्वारगेट (MH 13 CU 8339)ही पहिली बस सोलापूर एस.टी स्टँड येथून रवाना झाली. आगार व्यस्थापक कुलकर्णी, स्थानक प्रमुख शिंदे, इंचार्ज कोळी, विभाग नियंत्रण रमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पूजा करून एस.टी ड्रायव्हर नायडू व कंडक्टर अमर यादव यांना फेटा व घालून सत्कार करण्यात आला. प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. कार्यकर्ते व प्रवासी यांना लाडू वाटून फाटक्याची आतषबाजी करून जल्लोषपूर्ण वातावरणात बसला झेंडे दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत .