पंढरपूर - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारने योग्य उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पांडुरंगाची आषाढी यात्राही प्रतिकात्मक स्वरूपाची करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. पंढरपूर येथे येणाऱ्या पालख्यांना राज्य सरकारकडून निर्बंध घातले गेले आहे. मात्र तरीही रात्रीचा प्रवास करून संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील मानाची गुरुवर्य तात्यासाहेब वासकर यांची दिंडी अवघ्या सात दिवसांमध्ये पंढरपुरात दाखल झाली आहे. त्यांनी सात दिवसांमध्ये 230 किमीचे अंतर पूर्ण केले आहे. यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पायी मार्गक्रमण करत या दिंडीने वारीची परंपरा पूर्ण केली आहे.
- राज्य सरकारकडून पायी वारीवर बंदी -
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांसह मानाचे 10 पालखी सोहळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूरला येत आहेत. त्यातही ह. भ. प. बंडातात्या कराडकर व पांडुरंग महाराज घुले यांनी याबाबत आग्रह धरला होता. आपल्या निवडक वारकर्यांसह त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानानंतर चालायला सुरुवातही केली होती. परंतु दिघीजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व कराड येथे पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले. त्यानंतर पोलिसांना हुलकावणी देत दादा महाराज शिरवळकर यांची दिंडी आळंदीतून निघाली. परंतु, दिवे घाटात त्या दिंडीला पोलिसांनी अडविले व अटक केली.
- गुरुवर्य तात्यासाहेब वासकर यांची पायी दिंडी सातव्या दिवशी पंढरपुरात -
राज्य सरकारकडून पायीवारी मध्ये गर्दी होईल. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल. यामुळे सर्व 10 पालख्यांना बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची गुरुवर्य तात्यासाहेब वासकर दिंडी हातामध्ये टाळ आणि खांद्यावर वीणा घेवून रामकृष्ण हरी नामाचा जयघोष करत वारकऱ्यांनी पायी दिंडीवारीला सुरुवात केली. मात्र ही वारी त्यांनी दिवसाआड ऐवजी रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत पायी चालून पूर्ण केली. आळंदी ते पंढरपूर हे 230 किमीचे अंतर त्यांनी केवळ सात दिवसात पूर्ण केले. संचारबंदी पुर्वीच पंढरीत येवून त्यांनी चंद्रभागेचे स्नान केले. नामदेव पायरीचे व कळसाचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण करत त्यांनी वासकर दिंडी सोहळ्याची परंपरा कायम ठेवली आहे.
हेही वाचा - आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात; परवानगी असलेल्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश