सोलापूर - पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे सोलापुरात विविध ठिकाणी महावॅक्सीनेशन डे म्हणजेच लसीकरणाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यात एकाच दिवसात 7 हजार 410 कोरोना योद्धांना लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील 76 केंद्रावर हे लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांनी दिली.
दहा हजार कोरोना योद्धांच्या लसीकरणाचे नियोजन
लसीकरणाबाबत अनेक शंका आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती केली जात आहे. सुरवातीला फ्रंट लाईन वर्कर्सना लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अजूनही पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले नाही. अनेक कोरोना योद्धांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. दुसरा टप्पा सुरू होण्याअगोदर सर्व फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर व ग्रामीण भागात महावॅक्सीनेशन डे आयोजित केला आहे. यामध्ये 10 हजार फ्रंट लाईन वर्कर्सचे दर आठवड्याला लसीकरण केले जाणार होते. मात्र 76 केंद्रांमधून फक्त 7410 जणांचे लसीकरण झाले.
शहरात 5 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस
सोलापूर शहरात साडे आठ हजार आरोग्य कर्मचारी असल्याची नोंद आहे. आजतागायत 5 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील लस घेतली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस खात्यातील कर्मचारी आणि अधिकारी, महसूल खात्यातील कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी असे एकूण 27 हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे.