पंढरपूर - उजनी जलाशयातील पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे. गेल्या दीड महिन्यापासून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून उजनी बाबत आंदोलने केली जात आहेत. मात्र राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूरकरांची दिशाभूल करण्यासाठी पाच टीएमसी पाणीबाबत मंजूर झालेला आदेश रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही आदेश राज्य सरकारकडून रद्द कऱण्यात आला नाही. त्यामुळे उजनी धरण पाणी बचाव समितीकडून आंदोलन करण्यात येत आहे. आज मंगळवेढा तालुक्यात सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. यावेळी बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील, माऊली हलनवर, दीपक भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल
24 मे रोजी पंढरपूर तालुक्यातील पोखरी येथे उजनी धरण पाणी बचाव समितीकडून सातारा-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकार विरोधक आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मोहन उर्फ माऊली नागनाथ हलणवर, दीपक वासुदेव वाडदेकर, अतुल खुपसे, लखन थिटे, जयसिंग नागणे, निवास नागणे, विक्रम जगदाळे, वैभव नागणे या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख यांच्याविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी 25 मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून बोंबाबोंब आंदोलन केले होते. त्यामुळे आता उजनीतील पाच टीएमसी पाण्यासंदर्भात राज्य सरकारने तोंडी आश्वासन न देता लेखी स्वरूपात अध्यादेश काढावा. या मागणीसाठी शेतकरी संघटना व उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून जिल्ह्यांमध्ये जोरदार आंदोलने केली जात आहेत.
इस्लामपूर येथील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर उद्या बोंबाबोंब आंदोलन
इंदापूर तालुक्याला दिलेले उजनी धरणातील पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करावा, तो आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द करून त्या संदर्भाचा अध्यादेश काढावा.. या मागणीसाठी उद्या उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांकडून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काटेवाडी येथील घरासमोर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व इतर संघटनेतील कार्यकर्ते आंदोलन करणार असल्यामुळे घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर सांगली ग्रामीण पोलिसांकडून उजनी धरण पाणी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आले आहे.