सोलापूर - शहरात कडक लॉकडाऊन असतानाही बेकायदेशीर कृत्य सर्रास होत आहे. वन विभागाने शहरातील आसरा चौक येथे एका दुकानात धाड टाकली. त्यात बेकायदेशीर कासव विक्री करताना एका संशयीत आरोपीस अटक केली आहे. अमोल अनिल पोरे (वय 34, रामलिंग नगर, विजापुर रोड, सोलापूर) यास अटक करण्यात आले आहे. तर या कासवाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहेत. जवळपास तीन लाख रुपये अशी या कासवांची किंमत आहे.
सापळा रचून केली अटक -
सहायक उपवनसंरक्षक बाबा हाके यांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बाबा हाके स्वतः बनावट ग्राहक बनून अमोल पोरेंच्या संपर्कात होते. मंगळवारी सायंकाळी कासव विकत घेण्यासाठी अमोल पोरे यांना बोलावून घेतले. हाके यांनी स्वतः हॅप्पी पेट हाऊस दुकानात जाऊन खात्री केली आणि दहा कासव बाहेर काढायला लावले. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री शिंदे, वनपाल शंकर कुताटे, तुकाराम बादने, मुन्ना निरवणे यांनी ताबडतोब धाड टाकून सर्व कासव हस्तगत केले आणि कासव विक्रेत्यास ताब्यात घेतले. वन विभागाने सर्व कासव जप्त करून पुणे येथील वनविभागाच्या मुख्यालयात पाठवले आहे. तर न्यायालयाने आरोपीची जामीनावर मुक्तता केली आहे.
स्टारबॅक कासव विक्रीवर बंदी-
स्टार बॅक कासवावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यास बंदी आहे. स्टारबॅक जातीचे कासव फिश टॅंकमध्ये ठेवले जाते. फिश टॅंकची सजावट म्हणून या कासवाचा उपयोग केला जातो. सोलापुरात हस्तगत करण्यात आलेली कासवाची दहा पिल्ले 4 ते 5 महिन्यांची आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंत तीन लाख रुपयांपर्यंत असेल, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे.