सोलापूर - शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे सांगणे अवघड झाले आहे. शेती मालाला हमीभाव नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटोचे भाव गडगडले आहेत, कवडीमोल दराने भाव मिळत असल्याने टोमॅटोचे उभे पीक शेतातच पूरण्याची वेळ बळीराजावर आली आहे. दोन ते तीन रुपये प्रति कैरेटला भाव मिळत असल्याने जाण्यायेण्याचे खर्च देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. मार्केट यार्डात दररोज 4 ते 5 हजार कैरेट टोमॅटोची आवक होत असल्याने, कवडीमोल भाव मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी तर मार्केट यार्डात टोमॅटो विक्रीला आणलेही नाहीत.
सोलापूर जिल्ह्यात यंदा टोमॅटो या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यंदा टोमॅटोला योग्य भाव येईल, अशी आशा अनेक शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांच्या या आशेवर पूर्ण पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री 2 ते 3 रुपये प्रति कैरेट होत असल्याने, शेतकरी वर्गातुन चिंतेत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकता घराकडे परत येत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिले आहेत.
टोमॅटोची लागवड करत असताना मोठा खर्च-
टोमॅटो या पिकाची लागवड करत असताना शेतकऱ्यांना त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करावी लागते. त्यानंतर योग्य अंतरावर रोपांची लागवड केली जाते. त्यांनतर शेतकऱ्यांना या टोमॅटोची बांधणी करावी लागते. त्यासाठी बांबू व तारांचा उपयोग करावा लागतो. याची वाढ होत असताना त्याला टोमॅटोचे फळ लागते. टोमॅटोचे फळ लागल्यानंतर त्याची बाजारात विक्री करण्यासाठी तोडणी केली जाते. तोडणीसाठी भरपूर मजुरी द्यावी लागते. टोमॅटोची लागवड ते काढणी दरम्यान शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च येतो.
सोलापूर मार्केट यार्डात टोमॅटोचे प्रति कैरेट 2 ते 3 रुपये-
सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी टोमॅटो घेऊन येत आहेत. परंतु, टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रति कैरेटला 2 ते 3 रुपये भाव आला आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. शेतातून बाजारात घेऊन येण्यासाठी मालवाहतूकीचा खर्च देखील शेतकऱ्यांच्या हातात येत नाही. टोमॅटो तोडणीसाठी लावलेल्या मजुरांची मजूरी देखील देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जगावे की मरावे असा प्रश्न त्यांसमोर निर्माण झाला आहे.
गुजरात आणि जयपूर टोमॅटो निर्यात-
सोलापूर मार्केट यार्डातील व्यापारी हे टोमॅटो गुजरात येथील अहमदाबाद, राजस्थान येथील जयपूर या ठिकाणी निर्यात करत आहेत. पण त्याठिकाणी देखील भाव गडगडले असल्याने, म्हणेल तेवढे भाव व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मिळत नाही. व्यापाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांना सर्व माल खरेदी करत आहोत, त्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत असल्याची माहिती दिली, पण ज्या ठिकाणी टोमॅटो निर्यात केले जात आहे, त्या शहरातदेखील टोमॅटोचे भाव गडगडले आहेत.
हेही वाचा - येवल्यात शेतकऱ्याने टोमॅटो फेकले रस्त्यावर... भाव कोसळल्याने शेतकऱ्याचा संताप