सोलापूर : शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन गुरुवारी सकाळी सोलापूर शहरात झाले आहे. सोलापूरकरांनी अतिशय आनंदी व भक्तीमय वातावरणात या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी सोलापूर शहरात दाखल होताच, सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून परंपरागत पालखीचे स्वागत करण्यात आले. गजानन महाराज पालखीचे हे ५४ वे वर्ष आहे. सोलापूर शहरामध्ये गजानन महाराज पालखीचे आज आणि उद्या असे दोन दिवस मुक्काम असणार आहे. त्यामुळे सोलापूरमधील वारकरी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमदार प्रणिती शिंदें व मनपा आयुक्त यांची फुगडी : सोलापूर तुळजापूर महामार्गावरून गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन झाले. सोलापूर जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी पालखीच्या स्वागताला उपस्थित होते. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पालखी सोहळ्यात फुगडी खेळत आनंद लुटला. कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव आमदार प्रणिती शिंदे यांनी मनपा आयुक्तांसोबत फुगडी खेळली. राज्यात स्थिर सरकार यावे अशी विठुराया चरणी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली.
बा विठ्ठला धो धो पाऊस पडू दे : श्री सिद्धेश्वरांच्या पावनभूमीत संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. विधानसभेचा प्रमुख म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पालखीचे स्वागत केले. गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. महाराजांच्या पादूकांचे दर्शन सोलापूर जिल्ह्यात घेण्याचे भाग्य लाभले त्यामुळे आम्ही स्वतःला परम भाग्यश्याली समजतो. अशी प्रतिक्रिया कल्याणशेट्टी यांनी दिली. तसेच गजानन महाराज आणि विठुरायाला रुसलेला वरुणराजा प्रसन्न होऊ दे, पालखी पंढरपूर येथे पोहोचेपर्यंत धो धो पाऊस पडू दे, अशी प्रार्थना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली.
हेही वाचा -