सोलापूर - विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोबाइल चोरी करणाऱ्या 4 संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 53 हजार रुपयांचे मोबाइल आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. या आरोपींमधील एका संशयित आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. बाकीच्या तीन आरोपींचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे जामीन झालेला संशयित आरोपी हा तेलंगणा राज्यातील आहे. तो बाजारात जाऊन गर्दीचा फायदा घेत मोबाइल लंपास करत होता. चोरलेले मोबाइल जमिनीत पुरून ठेवत होता.
मोबाइल चोरट्यास रंगेहाथ अटक
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हतुरे वस्ती येथे मोठे भाजी मार्केट आहे. या ठिकाणी नेहमी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत व्यंकटेश नारायण पिटला (35 वर्ष, रा. श्रीनिवास नगर, जि. करनुल, तेलंगाणा) हा हातचलाखी करत मोबाइल लंपास करत होता. वाढत्या चोऱ्यामुळे पोलिसांची एक टीम वेषांतर करून बाजारात नजर ठेवून होती. व्यंकटेश पिटला याच्या संशयित हालचालीवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली आणि त्याला मोबाइल चोरी करताना रंगेहाथ पकडले. व्यंकटेश पिटला याला अधिक विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. त्याने अक्कलकोट नाका येथे भाड्याने एक खोली घेतली असल्याची माहिती दिली. खोलीजवळ जमिनीत मोबाइल पुरून ठेवले असल्याचेही सांगितले. काही दिवसानंतर चोरीचे सर्व मोबाइल तेलंगणा राज्यात जाऊन विविध ठिकाणी विक्री करत असल्याचीही कबुली दिली. दरम्यान, त्याला अटक करून 5 स्मार्टफोन आणि एक मोटरसायकल, असा 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उशाला ठेवलेले मोबाइल करायचा लंपास
कल्याण नगर, जुळे सोलापूर या भागातील अनेक नागरिक उन्हाळा असल्याने बाहेर अंगणात झोपतात. मात्र, उशाला मोबाइल ठेवणे किंवा दार उघडे ठेवून झोपणाऱ्या नागरिकांचे मोबाइल लंपास होत असल्याची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्याअनुषंगाने डीबी पथकाने रेकॉर्डवरील रोहित उर्फ टायगर विजय शिंदे (20 वर्षे, समर्थ नगर, सोलापूर), रवी नामदेव आखाडे (19 वर्षे, कल्याण नगर, सोलापूर), तेजस धर्मपाल कांबळे (21 वर्षे, गोकुळ नगर) या तिघांना अटक करून मोबाइल फोन आणि एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. हे चोरटे उशाला ठेवलेले मोबाइल चोरण्यास पटाईत होते.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, अजय जगताप, एपीआय शीतल कोल्हाळ, संजय मोरे, राजकुमार टोळनुरे, प्रकाश निकम, शिवानंद भीमदे, अनिल गवसाने, पिंटू जाधव, अतिष पाटील, इम्रान जमादार आदींनी या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या चोरट्यांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - मध्य प्रदेश : पंजाब नॅशनल बँकेमधून 3 कोटी रुपयांची कॅशियरकडून चोरी