सोलापूर - आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर सार्वजनिकरित्या जेवणाची पंगत घातल्याने माळशिरसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळापूर गावात पालखी स्थळाच्या शेजारी लाऊड स्पीकर लाऊन कार्यक्रम सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. महसूल प्रशासन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहाणी केल्यानंतर जेवणाच्या पंगती बसल्याचे निदर्शनास आले. यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण करून कारवाई केली. यावेळी जश्न-ए-ख्वाजा गरिब नवाज कॉन्फरन्स असा कापडी बॅनर लावण्यात आला होता. तसेच जेवणाच्या पंगती सुरू होत्या. यावेळी दीडशेहून अधिक लोक जेवण करत होते.
याप्रकरणी तिघांविरुद्ध वेळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व यात्रा, उरूस, जुलूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सभा-मेळावे, सामाजिक कार्यक्रम, इत्यादींचे आयोजन न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतरही संबंधित प्रकार उघडकीस आल्याने त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे.