सोलापूर - नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला 4 कोटी 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतचे हे सर्वाधिक उत्पन्न असून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दीड कोटी रुपयांची अधिकची देणगी मिळाली आहे. यात्रा कालावधीत 7 लाख 28 हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
यात्रेत विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी 39 लाख 63 हजार 424 रुपये तर माता रुक्मिणीच्या पायावर 7 लाख 72 हजार रूपये अर्पण केले आहेत. भक्तांनी 1 कोटी 84 लाख 54 हजार रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. लाडू प्रसादातून मंदिराला 72 लाख रुपये उत्पन्न मिळाले. नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासातून 18 लाख 91 हजार तर वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवासातून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळाले आहे.
विठ्ठलाच्या दर्शनाला दरवर्षी परदेशी भाविकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये काही भाविक हे परकीय चलन देवाच्या तिजोरीत जमा करत असल्याचे दिसून आले. इंग्लंड, नेपाळ, भूतान, सिंगापूर अशा वेगवेगळ्या देशातील चलन विठ्ठलाच्या दानपेटीत आढळून आले आहे. एकंदरीत गेल्या काही वर्षांपासून विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.