सोलापूर - शहरात शनिवारी (दि. 22 ऑगस्ट) पहाटे चोरट्यांनी लढवत शहरातील सहा मोबाईल दुकाने फोडली आहेत. पीपीई कीट घालून ही सहा दुकाने फोडली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरीच्या घटना कैद झाल्या आहेत. जवळपास 50 लाख रुपयांचे मोबाईल चोरीस गेले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून गुन्हा नोंद करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.
शहरात एकाच वेळी मोबाईलची दुकाने फोडल्याने गुन्हे शाखेवर ताण आला आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील ज्योती टेलिकॉम, जय सेल्स, कविता नगर पोलीस वसाहती समोरील युनिक एंटरप्राइजेस, नवी पेठ येथील गायत्री कम्प्युटर, अक्षय एंटरप्राइजेस, विजापूर रोड वरील एस जी सेल्स ही दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी ही चोरी करताना पीपीई कीट परिधान केले होते. त्यामुळे त्यांची चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नाहीत. मात्र, चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
युनिक एंटरप्राइजेस या दुकानचे मालक तौसिफ नदाफ (रा. कर्णिक नगर) यांनी सांगितले की, शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला आणि मोबाईल चोरले. पहाटे 5 च्या सुमारास आसपासच्या नागरिकांनी ही माहिती त्यांना दिली. त्यांनी लगेच दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी शटर पूर्णतः उचकटलेले होते. आतील विविध कंपन्यांचे मोबाईल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब जेलरोड पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा कविता नगर पोलीस वसाहती समोरील युनिक दुकानाकडे दाखल झाला. श्वान पथक देखील आले. बोटांचे ठसे घेणारे पोलीस देखील घटनास्थळी आले. सर्व तपासणी करून पंचनामा केला.
जुना एम्प्लॉयमेंट चौकातील गायत्री व जय सेल्स ही दुकाने फोडल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी जाऊन पाहणी केली. दुकान मालक महेश चिंचोळी यांनी माहिती देताना सांगितले की, जय सेल्समधील जवळपास 10 लाख रुपये किंमत असलेले 55 मोबाईल व ज्योती टेलिकॉम मधील 7 ते 8 लाख रुपयांचे मोबाईल लंपास झाले आहे.
लॉकडाऊनमध्ये मोबाईल दुकानदारांना मोठा आर्थिक फटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होते. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे बाजारपेठ व जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण, चोरट्यांनी धुमाकूळ घालत शहरातील दुकानांवर डल्ला मारला आहे. गणेश चतुर्थी निमित्ताने मोबाईल दुकानदाराने विक्री वाढेल या आशेने जास्तीचा माल भरला होता. पण, ऐन सणासुदीला चोरट्यांनी मोबाईल दुकानदारांची कंबरडे मोडले आहे.
हेही वाचा - सोलापूरात दोन पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल; एकास अटक तर दुसरा फरार