पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख धरणातून पाणी साेडण्यात आले होते. त्यामुळे चंद्रभागेला पूर येऊन, पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. तसेच अनेक कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. मात्र आता पंढरपूर हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
पुराचे पाणी हळूहळू कमी होत असल्यामुळे सकाळपासून काही मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे. पंढरपूर प्रशासनकडून खबरदारीचा उपाय म्हणून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर गुरुवारी पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे दुर्तफा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, मात्र आता वाहतूक हळूहळू सुरळीत होताना दिसत आहे. उजनी धरणातून भीमा नदीपत्रात 20 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंढरपूर शहरातील पूरस्थिती कमी होण्यास मदत होत आहे.