सोलापूर - आषाढी वारी सोहळ्यातील महाद्वार काल्याची परंपरा साजरी केलेल्या संत नामदेव महाराज यांच्या वंशजांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी, भाविक वारकरी मंडळाच्यावतीने ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी सोहळा महाद्वार काला प्रसाद परंपरेने केला जातो. त्याला अधिकृत परवानगी देऊन काला प्रसाद करणे शासन जबाबदारी होती. पण तसे न केल्यामुळे ही परंपरा सांभाळण्यात यावी म्हणून, नामदास महाराज व हरिदास महाराज यांनी महाद्वार काला केला. त्यामुळे जमावबंदी कायदा अंतर्गत 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व गुन्हे ताबडतोब रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाविक वारकरी मंडळाचे सुधाकर महाराज इंगळे यांनी केली आहे.
वारकऱ्यांवर गुन्हे दाखल करून वारकरी परंपरा मोडीत काढण्याचा मोठा कट असल्याचा आरोपही इंगळे महाराज यांनी केला आहे. आत्तापर्यंतचे संतांचे व वारकरी भाविकांचे योगदान विचारात घेऊन त्याअनुषंगाने असलेल्या परंपरेतील महाराज यांच्यावरील गुन्हे ताबडतोब रद्द करण्यात यावे असे निवेदन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना सुधाकर इंगळे महाराज व बळीराम जांभळे यांनी प्रत्यक्ष भेटून दिले. यावेळी ज्योतिराम चांगभले, बंडोपंत कुलकर्णी, मोहन शेळके उपस्थित होते.