सोलापूर Sushil Kumar Shinde on BJP : आगामी लोकसभा निवडणुका होण्या अगोदर सोलापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केल्यानं सोलापुरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपाकडून सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या विद्यमान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना कसलीही ऑफर देण्यात आली नाही, असा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. मात्र यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर देऊन सस्पेंस वाढवला आहे.
मोठ्या नेत्यानं दिली भाजपा प्रवेशाची ऑफर : माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपा प्रवेशाची ऑफर मिळाल्याचा दावा केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. "भाजपा प्रवेशासाठी आपल्याला मोठ्या नेत्यानं ऑफर दिली आहे. मात्र ते मोठे नेते कोण, याचा उलगडा मी करणार नाही. तसं नाव घेऊही नये. पण मी काँग्रेसी विचारांचा व्यक्ती आहे. काँग्रेस पक्ष सोडून कुठंही जाणार नाही," असं स्पष्टीकरण ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं.
काय म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे : अक्कलकोट तालुक्यातील एका गावात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपा प्रवेशाची ऑपर असल्याचा गौप्यस्फोट केला. "लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही मला भारतीय जनता पक्षानं ऑफर दिली. मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपाची ऑफर आहे. ते ही मोठ्या माणसानं मला पक्षप्रवेशाची ऑफर दिलीये," असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केल्यानं राज्याच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र या सगळ्या चर्चांचं सरतेशेवटी सुशिलकुमार शिंदे यांनी खंडन केलं आहे.
चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे भेटीनं उलथापालथ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. निवासस्थानाबाहेर येऊन चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला. यावेळी बोलताना त्यांनी "सोलापुरात अखिल भारतीय नाट्य संमेलन होणार आहे. परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील सर्व नेत्यांना आमंत्रित करावं लागते. ही एक सांस्कृतिक भेट होती," असंही चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. राजकीय विषयावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, "सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपकडून प्रदेश पातळीवरून कोणत्याही प्रकारचा ऑफर त्यांना दिली गेली नाही. मात्र भाजपामधील केंद्रीय पातळीवर देखील ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी बोलता बोलता बोलले असतील." चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा उल्लेख केला आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी नाव गुपित ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा :