सोलापूर - भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना सामान्य आणि वंचितांच्या समस्यांशी काही देणे-घेणे नाही. त्यांना त्यांची घराणेशाही कायम ठेवायची आहे. संविधानाने सामान्यांना दिलेले हक्क संपवण्याचे काम सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर म्हणाले. आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सामान्यांच्या हक्कासाठी वंचित आघाडीची लढाई सुरू आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्म आणि वंचितांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी ४८ जागा लढवत आहे. भाजपचे उमेदवार डॉ. जय सिध्देश्वर महाराज मनुवादी विचाराचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना मैदानात उतरविले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना स्थानिक नसल्याचा आरोप करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे सोलापुरात किती दिवस राहतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
बहुजन वंचित आघाडीवर एआयएमआयएम पक्षाशी युती केल्याचा आणि बहुजन वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. राजधानी दिल्लीत संविधानाला विरोध करणाऱ्यांनी संविधान जाळले तेव्हा केवळ खासदार असादोद्दीन ओवेसी यांनीच संसदेत तो मुद्दा लावून धरला होता. संविधान धोक्यात असताना भाजप-काँग्रेसने तोंड उघडले नाही. त्यातून उभयतांची छुपी मैत्री असल्याचे दिसून येते, असा घणाघाती आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.
संसदेतील सत्ताधारी पक्षाचे सदस्य सर्वसामान्यांचे अधिकार काढून घ्यायची भाषा करीत आहेत,त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे.ही लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीकोनातून लोकसभेची ही निवडणूक महत्वाची आहे.या स्थितीला आपले हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याकरिता आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन बहूजन वंचित आघाडीचे प्रशांत गायकवाड यांनी केले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. बाळासाहेेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ दक्षिण सोलापूर ताालुक्यातील कासेगांव येथील शिवाजी चौक येथे कॉर्नर सभा झाली. या सभेला सत्यशोधक परिवार आणि ओबीसी संघटनेचे शंकरराव लिंगे,बौध्द महासभेचे भिकाजी कांबळे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डी.एन.गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, अमित गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
समतेच्या पुरस्कर्त्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अशी मागणी करणारे थोर विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या अमानुष हत्या झाल्या आहेत. समतेचा विचार मांडणाऱ्यांच्या हत्यानंतर कर्नाटक भाजप कार्यालयासमोर फटाके फोडले गेले हे दुर्दैवी आहे. आपले हक्क आणि अधिकार मागणाऱ्यांचे गळे घोटण्याचे काम सुरू आहे, हे चिंताजनक असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
आजच्या बेकारीला शिंदे साहेब कारणीभूत -
गेली ४० वर्षे राजकीय सत्तास्थानी असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक उच्च पदे उपभोगली. राज्याचा ९ वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्या शून्याधारित अर्थसंकल्पातून त्यांनी बेरोजगारीची फलटण तयार केली.आजच्या बेकारीला शिंदे कारणीभूत असल्याचे गायकवाड म्हणाले.तसेच मोदी-फडणवीसांनी केलेल्या कोणत्याही घोषणांची पुर्तता त्यांनी केली नाही,असे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. विकासाच्या सर्व वाटा सत्तेतून जातात, आता वंचितांना सत्तास्थानी बसविण्याची आपली जबाबदारी आहे, असे मत यावेळी शंकर लिंगे यांनी व्यक्त केले.