सोलापूर - कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोविड वॉर्डमधील डॉक्टरने मेडीकल कॉलेजमधील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येने सिविलमधील डॉक्टर वर्गात खळबळ उडाली आहे. चैतन्य अरुण धायफुले( वय 24 वर्ष रा, तेलंगी पच्छा पेठ, सोलापूर) असे डॉक्टरचे नाव आहे.
सिविलमधील सहकारी डॉक्टर एकमेकांत चर्चा करत असताना अशी माहिती मिळाली की, कौटुंबिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली. ते डिप्रेशनच्या गोळ्याही खात होते. परंतु, अधिकृतरीत्या कोणीही माहिती देण्यास पुढे आले नाही. पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी काही तक्रार असल्यास नातेवाईकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस पूर्ण केलेले चैतन्य धायफुले हे गेल्या 4 महिन्यांपासून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत होते. कामाच्या वाढत्या ताणामुळे चैतन्य तणावाखाली होते. तरीही ते कोविड वॉर्डमध्ये सेवा बजावत होते. सहा महिन्यांपूर्वी एमबीबीएस पूर्ण करून सोलापूर सिव्हिल रुग्णालयात ते इंटर्नशिप करत होते. अचानक आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याने डॉक्टर वर्गात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चैतन्य यांनी व्ही. एम. मेडीकल कॉलेजचे वसतीगृह (जुना होटगी नाका) येथे रूममध्ये लोखंडी अँगलच्या फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. भाऊ देवल धायफुले यांना माहिती मिळताच त्यांनी मेडीकल कॉलेजच्या वसतीगृहाकडे धाव घेतली. भावाने चैतन्य यांना खाली उतरवून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, ओपीडीमधील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मृत डॉक्टरजवळ घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. मृत डॉक्टरांच्या नातेवाईकांनी अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दिली नाही. पोलीस तपास सुरू आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल भालेराव याचा तपास करत आहेत.