सोलापूर - साखर कारखान्याला ऊस घालून ७ महिने झाले, तरीही उसाचा एक रुपयाही न मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. औसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस हा सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांला घातलेला आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याने एकही रुपया न दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे.
औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला घातला होता. मात्र, ऊस घालून 7 महीने झाली तरीही शेतकऱ्यांना उसाचा एक रुपयाही अदा करण्यात आला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी मागील पाच महिन्यापासून कारखान्याचे चेअरमन आणि एमडीकडे बिलासाठी अनेक चकरा मारल्या मात्र, त्याचा कोणताही फायदा न झाल्यामुळे आज शेवटी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आठ दिवसात उसाचे पैसे मिळाले नाही तर, सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा नावाजलेला कारखाना असून राजकारण विरहित कारभार चालत असल्यामुळे मागील तीन दशकांपासून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला घातला. मात्र, साखर कारखान्याला आलेल्या अडचणीमुळे कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाचे बिल अदा झालेले नाही. सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे दिले असले तरीही जिल्ह्याबाहेरील असलेल्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना उसाच्या बिलापोटी एकही रुपया दिलेला नाही. वास्तविक पाहता ऊस कारखान्याला आल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला एफआरपीप्रमाणे एकरकमी पैसे द्यावेत, असा कायदा असताना देखील मागील सात महिन्यांपासून शेतकऱ्याला एकही रुपया देण्यात आलेला नाही.
सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्याविरोधात औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लिहून तक्रारीदेखील केले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडूनही या पार्टीच्या कायद्याच्या संदर्भात आलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित साखर कारखान्याला नोटीस काढून साखर व कारखाना जप्तीची कारवाई देखील प्रशासनाला करता येऊ शकते, अशा पद्धतीच्या कारवाया सोलापूर जिल्ह्यात झालेल्या आहेत. मात्र, हे शेतकरी औसा तालुक्यातील असल्यामुळे प्रशासनाकडून देखील या प्रश्नाला बगल देण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे.