सोलापूर - राज्याच्या सहकार क्षेत्रातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. पंढरपूरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी दहा वाजता त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार होणार आहेत.
जिल्ह्यातील मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व असलेले आणि पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणून सुधाकरपंत यांची ओळख होती. आमदार प्रशांत परिचारक यांनी संबंधित माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुधाकर परिचारक यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास सह्याद्री हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रक्तदाब आणि कोरोना यामुळे त्यांचा मृत्यू झालाय.
सहकार क्षेत्रातील 'डॉक्टर'
परिचारक यांनी विविध राजकीय पदे भूषविली आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, पंढरपूरचे आमदार, एसटी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. परिचारक यांनी खासगी साखर कारखाना विकत घेऊन त्याला सहकारी बनवले. शेतकऱ्यांनाच त्या कारखान्याचे मालक करण्याचे काम सुधाकर परिचारक यांनी तीन दशकापूर्वी केले होते. अनेक बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे त्यांना संबोधण्यात येत होते. काँग्रेसमध्ये वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र, 2019 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक भाजपाकडून लढवली.