सोलापूर - पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावासमुळे उजनी धरण भरले आहे. तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीलाही पूर आला. मात्र, तरीही संपूर्ण जिल्हा हा कोरडाच असून सगळे तलाव, ओढे तसेच सिना नदी कोरडी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व स्त्रोत पाण्याने भरून घेण्याच्या सूचना मदत व पुर्नवसन मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच पूरपरिस्थिती असलेल्या भागातील नागरिक आणि प्रशासनाने सतर्क राहावे. नागरिकांनी काही अडचणी आल्यास कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुणे येथे अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व मदतकार्याचा आढावा घेण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांसोबत सुभाष देशमुख यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी काही जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा व प्रशासनाच्या मदतकार्याची सविस्तर माहिती घेतली. प्रशासनाने आतापर्यंत सर्व पूरबाधितांना स्थलांतरीत केले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रोगराईला प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असून यामध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
भीमा नदीच्या काठच्या गावांना पुराचा धोका असल्याने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवू शकते. तसेच सध्या उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. असे असले तरीही जिल्ह्यातील काही तालुक्यांवर आपत्तीजनक परिस्थिती ओढावल्यास त्यासाठी प्रसाशन सज्ज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व तहसील प्रशासनाला आवश्यक त्या सर्व यंत्रणा पुरवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच गावकऱ्यांना दक्षता घेण्याच्या तसेच काही मदत लागल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पूरजन्य परिस्थितीमुळे राज्यामध्ये घडणाऱ्या सर्व परिस्थितीवर २४ तास देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यामध्ये नदीची पाणीपातळी, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांनाही सतर्क राहावे. प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वांना निवारा, भोजन, आरोग्य आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. जनावरांसाठी चारा व पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.