पंढरपूर: प्रस्थापित पंढरपूर विकास आराखड्याच्या व्यतिरिक्त ऐनवेळी कोणताही भूसंपादन प्रस्ताव विकासाच्या नावाखाली जोडू नये तसेच वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर मधील मंदिर परिसरामध्ये कॅरिडोर निर्माण करण्याचा प्रस्ताव आणू नये या मागणीसह प्रस्तावित आराखड्याला विरोध करण्यासाठी विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आज बुधवार दि.28 रोजी कडकडीत बंद पाळला (shutdown of traders in Pandharpur).
व्यापाऱ्यांचा नविन आराखड्याला विरोध: सध्या पंढरपूर मध्ये सुरू असलेला विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून मंदिर परिसरातील नागरिक आणि व्यापारी यांचा या प्रस्तावित आराखड्याला विरोध आहे. चाळीस वर्षांपूर्वी मंदिर परिसरामध्ये असाच विकास आराखडा झाला होता मात्र त्याचा मोबदला अजूनही नागरिकांना मिळाला नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. जुन्या आराखड्याच्या मोबदल्याचा प्रश्न अजूनही मिटला नसताना पुन्हा नवीन आराखडा आणण्याचा घाट का घातला जातो आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नामदेव पायरी जवळ असणारा सात मजली दर्शन मंडप सुद्धा नवीन विकास आराखड्यामध्ये पाडण्यात येणार असून त्यालाही नागरिकांचा विरोध आहे.
न्याय नाही मिळाला तर न्यायालयात जाणार: पंढरपूर मध्ये चार मोठ्या वाऱ्या भरतात त्यामध्ये सर्वात मोठी असणारी आषाढी एकादशी वारीच्या दिवशी लाखो लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. या गर्दीवर नियंत्रण मिळवणे हे प्रशासनासाठी एक कठीण काम आहे, म्हणून मंदिर परिसरामध्ये आषाढी एकादशीच्या वेळी होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या बंदच्या माध्यमातून आज व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. जर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.