सोलापूर - राज्यासह जिल्ह्याला कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची झळ बसत आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाची साखळी गाव गाड्यांच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रोज हजारो रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. त्यामुळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 21 मे पासून ग्रामीण भागांतील गावांमध्ये व नागरी भागांमध्ये संचारबंदी बाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाकडून काटेकोर उपाययोजना केल्या जात आहेत.
हेही वाचा - बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करत प्रहार संघटनेने जपली माणुसकी
पंढरपूर शहर व तालुक्यात सात ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा तालुक्यातील प्रशासनाकडून सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांची कठोर संचारबंदी लागू केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोरोनाबाधित वाढीचा वेग हा दुप्पटीने आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोना साखळीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्यातील मुख्य रस्ते सोडता इतर सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. त्यातच शहर व तालुक्यात सुमारे सात ठिकाणी नाकेबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची अहोरात्र तपासणी केली जात आहे. त्यामुळे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना तालुक्यात प्रवेश दिला जात नाही. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आरोग्य विभागाकडून जागीच कोरोनाची रॅपिड टेस्ट केली जात आहे. त्यामुळे, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसत आहे. तरी येत्या दहा दिवसांच्या संचारबंदीमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गात
कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर उतरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यातच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कर्मचाऱ्यांसाठी पोलीस दालनातच कोविड हॉस्पिटलची स्थापना केली आहे. त्यामुळे, कोरोना झालेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना योग्य ती सेवा उपलब्ध होत आहे. येत्या दहा दिवसांमध्ये संचारबंदीमधील नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असणार आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात असा असणार बंदोबस्त
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 21 मे ते 1 जून पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त ग्रामीण भागात तैनात करण्यात आला आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात विनाकारण कोणी फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबरीने व्यापाऱ्यांना घरपोच सेवा देण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात पोलिसांकडून बंदोबस्तासाठी योग्य ते पाऊल उचलले आहेत. शहरासाठी आठ पोलीस अधिकारी, 130 पोलीस कर्मचारी, तर ५० होमगार्डची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी दिली.
ग्रामीण भागातील सीमांवर नाकाबंदी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दहा दिवसांची संचारबंदी करून कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे, तर सोलापूर शहर वगळता ग्रामीण भागामध्ये नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. मात्र, या काळात अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, माढा, बार्शी, करमाळा हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. तरी दहा दिवसांमध्ये नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
हेही वाचा - पुणे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण, सोलापुरात आरोपीला अटक