सोलापूर - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिनानिमित्त महानगरपालिकेत महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मनपा उपायुक्त अजयसिंह पवार यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था दिनाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका सर्व प्रथम भारतात स्थापन करून लोकप्रतिनिधींमार्फत येथील स्थानिक समस्या सोडवून राज्यकारभार केला जातो. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण नागरिकांना पाणीपुरवठा, दिवाबत्ती, ड्रेनेज, रस्ते, शहर स्वच्छता या सुविधा अविरतपणे आपण प्रत्यक्ष सेवा देत आहे.
या कार्यक्रमाला सभागृह नेते श्रीनिवास करली, मुख्य लेखापाल गिरीश धनवे, आरोग्य अधिकारी संतोष नवले, जनसंपर्क अधिकारी विजय कांबळे, नगरसचिव बागवान, अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे, अविनाश मोहिते, संजय तोडणकर, सहायक विद्युत अभियंता राजेश परदेशी यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.