सोलापूर - विविध मागण्यांसाठी धनगर समाजाने सुरू केलेले बेमुदत उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले आहे. पंढरपुरात सुरू असलेल्या या उपोषणात पांडुरंग मेरगळ यांनी लहान मुलींच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर येथील धनगर बांधवांनी जल्लोष केला. धनगर समाजाला अनुसूचीत जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळावे तसेच आरक्षणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यासाठी येणारा खर्च राज्य शासनाने करावा, अशा विविध मागण्यांसाठी धनगर आरक्षण समन्वय समितीचे पांडुरंग मेरगळ, राम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 ऑगस्टपासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावर बेमुदत उपोषण सुरू होते. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी धनगर समाजाने आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर राम गावडे, विठ्ठल पाटील, मंत्री राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना आरक्षणाच्या याचिकेची तातडीने सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, परमेश्वर घोंगडे व योगेश कातके यांच्या वारसांना शासकीय नोकरी देणे,इ. मागण्या मान्य केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आज (दि.१५ऑगस्ट) रोजी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेऊन बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. विधानसभा निवडणुका असल्याने सरकार आमच्या मागण्या मान्य करेल. असा विश्वास धनगर आरक्षण समन्वय समितीचे सदस्य पांडुरंग मेरगळ यांनी व्यक्त केला. सरकारने दगाबाजी केल्यास त्यांना विधानसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवू, असेही ते म्हणाले.