सोलापूर - लॉकडाऊनच्या कालावधी मधील वेतन कपात रोखावी, या मागणीसाठी सोलापूर एसटी कामगार संघटनेच्या वतीने विभागीय कार्यालया समोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखून हे आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे एसटीची वाहतूक अंशतः सुरू आहे. फक्त जिल्हा अंतर्गत एसटीची बससेवा सुरू आहे. काही मोजकेच कर्मचारी ड्युटीवर आहेत. परंतु राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनाकडून वेतनात मोठी कपात करण्यात आली आहे. एप्रिलचे 25 टक्के वेतन व मे आणि जूनचे 50 टक्के वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. शासनकडून कोणत्याही वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. शासनाच्या या धोरणाविरोधात काळ्या फिती लावून विरोध करत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे सचिव प्रशांत गायकवाड, अध्यक्ष तानाजी सावंत, संतोष जोशी, प्रभाकर शेरखाने, निलेश कुलकर्णी, श्रीकांत चव्हाण, किरण अनगरकर आदी जण काळ्या फिती लावून या धरणे आंदोलनात उपस्थित होते.
दरम्यान, देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रात गेले काही दिवस रोज 5 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत होती. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कोरोनाच्या ६ हजार ३६४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ३ हजार ५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण कोरोनाबाधित संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन दोन गटात दगडफेक; हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने हाणामारी
हेही वाचा - सासू सासऱ्याकडून जावयास मारहाण; सोलापूरातील घटना