सोलापूर - राज्यातील 1 लाख 10 हजार एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ऐन दिवाळीत वेतनापासून वंचित राहिल्याने सण कसा साजरा करायचा, असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील ड्रायव्हर, कंडकटर, मेकॅनिक, क्लार्कसह सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंब राहत्या घरी आक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहेत.
विधान परिषदेची निवडणूक असल्याने सोलापूर जिल्ह्यात व शहरात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर आंदोलन किंवा एसटी बंदची घोषणा किंवा निवेदन कार्यक्रम घेण्यात आले नाही. आपल्या कुटुंबासह राहत्या घरी आक्रोश व्यक्त केला असल्याची माहिती सोलापूर डिव्हिजनमधील एसटी युनियन कर्मचाऱ्यांनी दिली.
एसटी वाहतूक सुरळीत-
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले नसल्याने आक्रोश आंदोलन केले जात आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम एसटी वाहतुकीवर झाला नाही. प्रवासी वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा ताण दिसला नाही. सर्व एसटी कर्मचारी सुरळीतपणे कामकाज करत होते.
पोलीसांची आक्रोश आंदोलनावर बारीक नजर
एसटी कर्मचारी पुन्हा एकदा वेतनासाठी आक्रोश आंदोलन करून एसटी वाहतूक बंद करतील, म्हणून पोलीस या आंदोलनावर बारीक नजर ठेवून होते. एसटी युनियनच्या सदस्यांवरदेखील बारीक नजर होती.
हेही वाचा- एसटी आक्रोश आंदोलन LIVE : जळगावात एका कर्मचाऱ्याची आत्महत्या