सोलापूर - शहरात 23 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा आदेश लागू केला आहे. पूढील चार दिवस शहरात कोणालाही फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील ठराविक पास धारकांना यामधून सूट देण्यात आली आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशानूसार सोमवारी दुपारी दोन वाजल्या पासून 23 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहेत. त्याचबरोबर सोलापुरातील गेल्या काही दिवसात ज्या भाजी, किराणा, फळ, मेडिकल स्टोअर्स, बँका यांच्या सेवा सुरू होत्या, त्याही आज दुपारी दोननंतर बंद करण्यात येणार आहेत. सर्व सरकारी कार्यालये ही या काळात बंद राहतील. मागील काही दिवसाच्या काळात पत्रकारांसह इतरांना पास देण्यात आले आहेत. मात्र पूढील चार दिवस पास असले तरी अत्यावश्यक सेवा मधील पोलीस, डॉक्टर व अन्य अधिकारी यांना वगळून इतरांना या काळात शहरात फिरण्यास प्रतिबंध लागू होणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.