सोलापूर - शहर व जिल्ह्यात 13 हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरासह जिल्ह्यात एकूण 66 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून त्याद्वारे अनधिकृत व्यक्ती आणि वाहनांचे शहर - जिल्ह्यात प्रवेश रोखण्यात आले आहे. शहरात 4000 व्यक्तींवर 2000 गुन्हे दाखल करण्यात आले असून शहरातून सुमारे 5000 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर ग्रामीण भागात साधारण 800 गुन्हे नोंदविण्यात आले असून 7567 वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदर गुन्हे हे संचारबंदीमध्ये विणाकारण फिरणार्या व्यक्तींवर नोंदविण्यात आले आहेत. संचारबंदी काळात ड्रोनद्वारे सर्वत्र नजर ठेवण्यात आली असून ड्रोनच्या मदतीने अशा व्यक्तींची ओळख करून गुन्हे दाखल करण्याचे सुरू आहे. तरी नागरिकांनी शिस्त पाळावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.