सोलापूर - नशा करण्यासाठी पैसे नसल्याने बाजारातील गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करणाऱ्या चौकडीच्या मुसक्या सदर बझार पोलिसांनी आवळल्या आहेत. नागेश शवरप्पा गायकवाड (वय 27 वर्षे, रा. इंदिरा गांधी झोपडपट्टी, होटगी स्टेशन, ता. दक्षिण सोलापूर), कुमार नागेश गायकवाड (वय25 वर्षे, रा. लिमयेवाडी, भूषण नगर, सोलापूर), संतोष उर्फ पांडू बाबू जाधव (वय 40 वर्षे, रा. भैरू वस्ती, लिमयेवाडी, सोलापूर), अनिल नागेश गायकवाड (वय 26 वर्षे, रा. लिमयेवाडी, सोलापूर) यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या हे चौघे पोलीस कोठडीत आहेत.
नागेश गायकवाड, कुमार गायकवाड, अनिल गायकवाड, संतोष जाधव यांना अनेक दिवसांपासून गांजा, दारू आदीचे व्यसन जडले होते. व्यसनासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला. सोलापूर शहरातील बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत हातोहात मोबाईल लंपास करण्यास सुरुवात केली. अनेक गुन्हे सदर बझार, विजापूर नाका आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नोंद झाले होते. सदर बझार पोलिसांनी यांचा शोध घेत चोघांना बेड्या ठोकल्या आहेत. चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
सदर बझार पोलीस मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत होते. घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. काही फुटेजमध्ये हे चौघे आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी संशयितांचा शोध घेतला. दक्षिण सोलापुरातील नागेश गायकवाड यास पकडले त्यानंतर बाकीच्या तिन्ही संशयितांना पकडले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - शिवसेनेला भाजपसोबत फायदा, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहिल्याने नुकसान - केंद्रीय मंत्री