सोलापूर - सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. या शिवाय दोनच दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यातील एका बैठकीला शिवशंकर हे हजर होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात कोण कोण आले, याचा शोध घेतला जात आहे.
आजपर्यंत अनेक नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता खुद्द महापालिका आयुक्त यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. आयुक्त पी. शिवशंकर हे सोलापूरात पदभार घेतल्यापासून जास्तीत जास्त फिल्डवर्कवर होते. त्यामधून ही लागण झाल्याचा संशय आहे.
त्या बैठकीला आयुक्त शिवशंकर होते हजर -
शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय मामा शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने आदींनी सोलापूर शहराला भेट देत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह पी. शिवशंकरही उपस्थित होते.
दरम्यान, पालिका आयुक्त शिवशंकर हे कोरोनाबाधित झाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वतःला गृह विलगीकरणात राहणे पसंत केले आहे. दुसरीकडे आयुक्ताच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. कोरोनामुळे खचून न जाता आपण लवकर बरे होऊन, पुन्हा कामावर येऊ, असा विश्वास व संदेश शिवशंकर यांनी माध्यमांना दिला आहे.
हेही वाचा - इंधन दरवाढीविरोधात माकपचे अनोखे आंदोलन, दुचाकीची अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध
हेही वाचा - पंढरीतील मानाचा वारकरी ठरला; जाणून घ्या कोण आहे 'तो' मानकरी