सोलापूर - सोलापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे सध्या ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनची मागणी वाढल्याने दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पूर्वी एक ऑक्सिजनचा सिलिंडर साधारणपणे 119 रुपयांना मिळत असे, मात्र आता त्यामध्ये वाढ होऊन ऑक्सिजन सिलिंडरचा दर 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोलापूरमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज 40 ते 50 हजार ऑक्सिजन सिलिंडरची मागणी होत आहे.
दोन कंपन्यांद्वारे ऑक्सिजनची निर्मिती
सोलापुरातील टेम्भुर्णी येथील एस. एस. बॅग्स आणि होटगी रोड येथील आर. टी. एस. या दोन कंपन्यांत ऑक्सिजन तयार केला जातो. मात्र उत्पन्नापेक्षा मागणी प्रचंड वाढल्याने, या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांवर ताण आला आहे. 24 तास ऑक्सिजनचे उत्पादन करून देखील या कंपन्या मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - आधी आईचा मृत्यू, नंतर मुलगा, नातू, पहिली बहिण, दुसरी बहिण, येवल्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनाने मृत्यू