सोलापूर - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून आवश्यक तितका निधी दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
व्हिडिओ कॅान्फरन्समध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.
हेही वाचा - देशभरात कोरोनाचे १६६ रुग्ण; मागील २४ तासात १७ रुग्णांची भर
पालकमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य याची खरेदी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून केली जावी, यास राज्य शासनाने सहमती दिली आहे. आवश्यक असणारे व्हेंटिलेटर, बेड, पीपीई, मास्क, सॅनिटायझर, आयसोलेशन आणि क्वारंटाईन सेलसाठी लागणारे साहित्य याची लवकरात लवकर खरेदी करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस करीत असलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्र्यांना दिली.