सोलापूर - जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असल्याचे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर जिल्ह्यासाठी 2019-20 साठी 347 कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. यात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. याचबरोबर शासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. पालखी मार्गांना महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण रस्त्यांचे कामकाज केले जात आहे. तर पालकमंत्री पांदण रस्त्याच्या माध्यमातून गावागावात संपर्क यंत्रणा विकसित केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा दिला जात असून आठशे गावठाणांची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी केली जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी सोलापूरकरांनी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.