सोलापूर - जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या तीन मुलांना विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यात घडली आहे. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर आहे. मुलांना औषध पाजल्यानंतर स्वतः पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. माढा तालुक्यातील बेंबळे येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
बेंबळे येथील हरिदास कांबळे यांचे साडू रवींद्र लोखंडे (वय 35) हे आपल्या तीन मुलांसह कांबळे कुटुंबाकडे आले होते. रवींद्र यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:च्या तीन मुलांना भजी आणि शीतपेयामध्ये विष मिसळून मुलांना प्यायला दिले. यानंतर त्यांनी स्वतः घोटी रस्त्यावरील कालव्याजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अनुष्का रवींद्र लोखंडे (वय 11) ही मुलगी या घटनेत वाचली असून, अजिंक्य लोखंडे (वय 9) आयुष लोखंडे (वय 6) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच मुलीवर सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात झाली असून, याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.
काय आहे प्रकरण?
मृत रविंद्र लोखंडे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रहिवासी असून तो वडापुरी येथे कुटुंबासह राहत होता.
माढा तालुक्यातील बेंबळे गावात तो आपला मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांच्यासह सुनिता कांबळे या मेव्हणीला भेटायला गेला होता. यावेळी काही कारणाने त्यांच्यामध्ये वाद झाले. यानंतर रवींद्रने स्वतः आपल्या मुलांना शीतपेयातून विषारी औषध पाजले व स्वतःही गळफास घेतला.
रवींद्र लोखंडेने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र स्वतःच्या मोबाईल वरुन मित्र परिवारासह व नातेवाईकांना पाठवले आहे. यामध्ये त्याने मेव्हणी सुनिता हरी कांबळे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. मात्र, तिने विश्वासघात केल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे रवींद्र याने पत्रात म्हटले आहे. तसेच माझ्या व मुलांच्या मृत्यूस केवळ अनिता कांबळे हिला जबाबदार धरण्यात यावे, असा उल्लेख त्याने पत्रात केला आहे.