सोलापूर : शहरात महंतावर गर्दुल्यांनी शसस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे. गर्दुल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महंतास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राम कृपाळू दास महाराज (वय ५३) असे जखमी महंताचे नाव आहे. सोलापूर एसटी स्थानकापासून जवळच असलेल्या मुरारजी पेठेत निराळे वस्ती रस्त्यावर राज राजेश्वरी हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी ही घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निराळे वस्तीमधील या राज राजेश्वरी मंदिरात साधूंचा मठ आहे. तेथे देशाच्या विविध भागातून आलेले साधू, महंत वास्तव्य करतात. या मठात गोधळ झाल्याने साधू संतानी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गांजा ओढण्यास विरोध : सोलापूर शहरातील राज राजेश्वरी मंदिरात व मठात भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु आजूबाजूला असलेले समाजकंटकांचे टोळके किंवा गर्दुले हे गांजा ओढण्यासाठी मठात नेहमी घुसखोरी करतात. साधू, महंत आणि भाविकांचा विरोध झुगारून गांजा ओढण्याचा समाजकंटकांचा कार्यक्रम दररोज सुरूच असतो. गर्दुल्यांना गांजा ओढण्यास विरोध करून मंदिरातून हाकलण्याचा प्रयत्न केला जातो. गांजा ओढून नशेत असलेले गर्दुले हे साधू संतांच्या अंगावर धावून येत असतात. सोमवारी दुपारी समाजकंटक असलेल्या गर्दुल्यांनी क्रूरतेचा कळस गाठला.
गर्दुल्यांच्या तावडीतून सुटका : गर्दुल्यांना विरोध करणे साधू व महंतास भारी पडले आहे. गर्दुल्या टोळक्याने मठात धुडगूस घालत जबर साधू संतांना जबर मारहाण केली. गांजा ओढण्यास विरोध करणारे महंत राम कृपाळू दास महाराजांवर सशस्त्र हल्ला केला. गर्दुल्यांच्या हल्ल्यात महंत रामकृपाळ दास यांच्या गळ्यावर आणि हनुवटीवर गंभीर जखम केली आहे. त्यांच्यावर हल्ला होताना इतर साधूंनी तात्काळ धावून येत हल्लेखोर समाजकंटकांच्या तावडीतून महंतांची सुटका केली.
धरणे आंदोलने व मोर्चे निघणार : सोलापूर शहरातील निराळे वस्ती परिसरात राज राजेश्वरी मंदिरा शेजारी होत असलेल्या त्रासाबाबत अनेकदा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे समाजकंटक मठात येऊन गांजा ओढतात. साधू संतांना व महंतांना त्रास देतात अशी तक्रार करण्यात आली होती. सोलापूर शहर पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली असती तर,आज ही वेळ आली नसती अशी खंत मठातील साधूंनी शासकीय रुग्णालयात व्यक्त केली. समाजकंटकांवर कारवाई झाली नाही तर, मोर्चे काढू,धरणे आंदोलने करू असा इशारा मठातील साधूंनी दिला आहे.
हेही वाचा :