सोलापूर - एमआयएमचे मध्य सोलापुरातील विधानसभेचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यासंबधितचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शहर काँग्रेसने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या वक्तव्याबाबत चौकशी करण्याची मागणी प्रकाश वाले यांनी केली आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभेची निवडणूक ही संपूर्ण राज्यात गाजली होती. या मतदार संघात एमआयएमने प्रणिती शिंदे यांच्यासमोर मोठे तगडे आव्हान उभे केले होते. एमआयएम या पक्षाने उद्योगपती फारूक शाब्दी यांना उमेदवारी दिली होती.
फारूक व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाले? -
2014च्या विधानसभा निवडणुकीतदेखील एमआयएमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. 2019 च्या निवडणुकीतदेखील एमआयएमचे फारूक शाब्दी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर एका कापडाच्या दुकानात अनौपचारिक गप्पा सुरू असताना फारूक शाब्दी यांनी प्रणिती शिंदे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सोलापूर शहर मध्य मतदार संघात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. यंदा मला आमदार होण्याची चांगली संधी आली होती. मात्र, अनेकांनी मला अडचणीत असल्याचे पाहून मला वेगळी वागणूक दिली आहे. आमदार होण्याची चांगली संधी मला आली होती. उद्या मी जिवंत राहील किंवा नाही हे मला माहिती नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीत लोक मला एवढे सहकार्य करतील की नाही हे देखील मला माहित नाही, असे फारूक बोलत होते. त्यावेळी बाजूला बसलेला व्यक्ती असे होणार नाही म्हणाला. त्यानंतर फारूक शाब्दी काय होईल काही सांगता येत नाही, असे म्हणाले. त्यानंतर प्रणिती शिंदेंबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
प्रणिती शिंदेंना काही झाल्यास फारूक शाब्दी जबाबदार - प्रकाश वाले
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे विकास कामाच्या मुद्द्यावर प्रचंड मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा विजयी झाल्या. मात्र, राजकारणाचा खेळाडूवृत्तीने स्वीकार करण्याऐवजी एमआयएमचे पराभूत उमेदवार फारूक शाब्दी यांनी खासगी मुलाखतीमध्ये आमदार प्रणिती शिंदेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानाची सायबर सेल माध्यमातून चौकशी व्हावी. तसेच त्यांच्या या विधानाचा सोलापूर शहर काँग्रेस कमिटी तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे प्रकाश वाले म्हणाले.
फारूक शाब्दी यांच्या वादग्रस्त विधानामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या जीवाला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काही घडल्यास एमआयएम पक्षाचे पराभूत उमेदवार फारूक शाब्दी हे सर्वस्वी जबाबदार राहतील याची आपण नोंद घ्यावी. पुढे भविष्यात आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर व्हिडिओ, अश्चिल व्यंगचित्र व व्हाट्सअॅपच्या माध्यमातून, वादग्रस्त विधानातून बदनामी करणाऱ्यांवर कडकपणे कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत त्यांनी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांना निवेदन दिले. यावेळी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, नगरसेविका फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, एनएसयूआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे, यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.