पंढरपूर(सोलापूर)- अफगाणिस्तान मध्ये तालिबानींनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यानंतर तालिबानांच्या अधिपत्याखाली तेथील व्यवहार आणि कारभार आता सुरू झाला आहे. अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या तालिबान्यांनी भारतासोबत होणारी आयात निर्णय बंद केली. त्याचा फटका भारतीय कृषी क्षेत्राला मोठ्याप्रमाणात बसला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या संघर्षामुळे सोलापूर जिल्ह्यांमधून उत्तर-पूर्व आशियामध्ये केली जाणारी केळीची निर्यात केली ठप्प झाली आहे.
तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवला असून देशात अराजकता पसरली आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आतापर्यंतच चांगले द्विपक्षीय संबंध होते. मात्र, आता तालिबानी हातात सत्ता गेल्यानंतर सुरक्षा आणि व्यापार याबाबतीत भारतासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. तालिबानने भारतासोबत होत असलेली आयात-निर्यात बंद केली आहे. भारतीय निर्यात संघटना फेडरेशनचे डॉ. अजय सहाय यांनी ही माहिती दिली. त्याचाच फटका महाराष्ट्रातील केळी उत्पादकांना बसला आहे.
करार झाला रद्द, शेतकरी चिंतेत
अफगाणिस्तानमधील तालिबान्यांनी भारतातून होणाऱ्या मालाची आयात बंद केली. तसेच ऑगस्ट-सप्टेंबर अफगाणिस्तानात होणारी 15 कन्टेनर केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. याचा आर्थिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. अफगाणिस्तान मध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात केळीचे निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मात्र, यंदाचा करार रद्द झाल्यामुळे निर्यातक्षम माल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्यता कमी आहे.
अफगाणिस्तान हा ईराण नंतरचा भारतातून केळी आयात करणारा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. भारतातून अफगाणिस्तानात दर वर्षी किमान 30 टक्के केळी निर्यात होते. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, करमाळा, बार्शी, माढा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
दरम्यान अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबली आहे. वेळीच सुधारणा झाली नाही तर, त्याचा आणखी फटका केळी निर्यातदार शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. आधीच कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत असतानाच अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे केळी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामूळे मागील काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक बंदीचा मोठा बसला होता. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर केळी दरात तेजी निर्माण झाली आहे. मात्र निर्यातीस खीळ बसणार असल्याने या केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे दुसऱ्या देशामध्ये आपला माल पाठवण्यासाठी धडपड करावी लागाणार आहे.