सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही सोलापूरात कांद्याची आवक झाली आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कांद्याचे भाव हजार रूपयाच्या आतच राहिले आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
कांदा व्यापाऱ्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 एप्रिलपर्यंत कांद्याचा लिलाव करणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तू म्हणून कांद्याचा लिलाव सुरू ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. या सूचनेनंतर 2 एप्रिल रोजी कांद्याचा लिलाव सुरू होणार, अशी माहिती सगळीकडे गेल्यामुळे 2 तारखेला तब्बल 700 ट्रक कांद्याची आवक बाजार समितीमध्ये झाली. व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी केला. त्यानंतर 3 एप्रिल रोजी देखील मोठ्या प्रमाणावर कांदा बाजार समितीमध्ये आला होता. शेतकऱ्यांचा आलेला हा कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. मात्र लिलाव झाल्यानंतर उद्यापासून 15 एप्रिलपर्यंत लिलाव न करण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
700 ट्रक कांदा कमी दराने खरेदी केल्यानंतर आता व्यापाऱ्यांनी खरेदी थांबविली आहे. 2 एप्रिल रोजी व्यापाऱ्यांवर गर्दी जमविली म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लिलाव करतांना गर्दी केल्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव थांबविला असला तरी यातून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान होणार आहे. कांदा हा शेतीमाल नाशवंत प्रकारात मोडतो. ठराविक कालावधीत याची विक्री झाली नाही, तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. सरकारने जीवनावश्यक शेतीमालाची विक्री सुरू केल्याचे जाहीर केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कांदा पिशव्यामध्ये भरून विक्रीसाठी तयार ठेवला होता. मात्र आता अचानक सोलापूर बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केल्यामुळे त्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.