पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णांलयात डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू यासाठी वितराकांनी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तसेच करावयाच्या उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, आयएमएचे डॉ.पंकज गायकवाड तसेच ऑक्सिजन वितरक उपस्थित होते.
रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठ्यावर नियंत्रण
ऑक्सिजन पुरवठा धारकांनी ऑक्सिजन पुरवताना प्राधान्याने रुग्णालयांना पुरविण्यात यावा. रुग्णालयांनी ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करावा अनावश्यक वापर व गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर बेड आणि ऑक्सिजन तसेच औषधे वेळेवर उपलब्ध होतील याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण असून, त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी संबधितांनी वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचनाही जाधव यांनी यावेळी दिल्या.
वार्डस्तरीय समिती व ग्रामस्तरीय समितीकडून जनजागृती
तालुक्यामधील शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध शाळा मठ ताब्यात घेवून कोविड केअर सेंटर उभारणीसाठी कार्यवाही करावी. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता भविष्यातील नियोजनासाठी आरोग्य यंत्रणेने पेड कोविड सेंटरच्या प्रस्तावाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आवश्यक निर्णय घ्यावा. खासगी रुग्णांलयानी कोविड केअर सेंटर निर्मितीसाठी दिलेल्या रुग्णांलयाची आवश्यक तपासणी करुन प्रस्ताव सादर करावा. तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वार्डस्तरीय समिती व ग्रामस्तरीय समितीने कार्यरत राहून जनजागृती करावी, असे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा व औषधसाठा मुबलक प्रमाणात मिळावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
वेदांत व व्हिडीओकॉन भक्त निवासामध्ये 200 बेड -
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वेदांत व व्हिडीओकॉन भक्त निवासामध्ये 200 बेड प्रशासनास मोफत उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या तसेच आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली .