सोलापूर - पुढील तीन दिवस सोलापुरात संपूर्ण संचारबंदी असल्यामुळे आज दुपारपर्यंत अत्यावश्यक खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. मात्र, या सवलतीचा गैरफायदा घेत हजारो लोक सकाळी बाहेर पडले आहेत. हजारो लोक एकत्रित आल्यामुळे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नावर सोलापूरकरांनी पाणी फिरवल्याचे चित्र आहे.
सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशावेळी सोलापूरकरांनी घरातच राहणे आवश्यक असताना हजारो सोलापूरकर रस्त्यावर उतरत भाजी मंडईमध्ये जमा झाले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्याने अनेक भाजी मंडई स्टॉल, किराणा दुकान येथे गर्दी उसळली. परिणामी पोलीस आयुक्तांनी या सर्वांची दखल घेत गर्दी झालेल्या ठिकाणाहून विक्रेते आणि ग्राहकांना हुसकावून लावले. विक्रेते आणि ग्राहकांना हिसकावून लावण्याशिवाय पर्याय नाही, अशा सूचना दिल्या. वाहनातून फिरणाऱ्या लोकांचे वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
अत्यावश्यक खरेदीसाठी दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेत नियम न पाळणे यामुळे प्रशासनाला कारवाई करण्याशिवाय गत्यंतर उरलेले नव्हते. सोलापुरात कोरोनाची संख्या वाढत असताना सोलापूरकरांनी संयम बाळगून घरातच राहणे आवश्यक आहे.