सोलापूर - शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोना तपासणीची सक्ती करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील सर्व भाजी मंडई येथील भाजी विक्रेते यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी 7 दिवसाची मुदत देण्यात आली होती. आज सोमवारी शहरातील 350 भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 18 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेले आहेत. तसेच यापुढे भाजी विक्रेत्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात अजून कोरोनाची तपासणी करून घ्यावे व चाचणी केल्याशिवाय भाजी विकू नये, असा आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढला आहे.
भाजी विक्री करताना कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक -
शहरातील भाजी मंडई येथील विक्रेत्यांनी भाजी किंवा फळे विकताना आपल्या जवळ कोरोना निगेटिव्ह अहवाल जवळ ठेवणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. तसेच सर्व दुकानदार व व्यापारी यांनी पुढील एका आठवड्यात कोरोनाची तपासणी प्रायव्हेट लॅबकडून करून घ्यावे त्याचा निगेटिव्ह अहवाल आपल्या दुकानात ठेवावा. तपासणी अहवाल न आढळल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येणार आहे.
बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी होणार -
सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सोलापुरात बाहेरगावी वरून येणाऱ्या प्रवाशांचा 72 तास अगोदर असलेला रिपोर्ट ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर शहरातील 76 फळ व भाजी विक्रेत्यांवर कारवाई -
आरोग्य निरीक्षक यांच्या माध्यमातून शहरातील सर्व भाजी मंडई येथे व्यापाऱ्यांनी कोरोनाची चाचणी केली आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात आली. शहरातील मुख्य भाजी मार्केट येथील फळ विक्रेते व भाजी विक्रेते असे एकूण 117 विक्रेत्यांची कोरोना चाचणी केली आहे का नाही याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 41 फळ विक्रेते व भाजी विक्रेते यांनी कोरोना चाचणी केलेली निगेटिव्ह अहवाल दाखवण्यात आले. तसेच 76 फळ विक्रेते व भाजीविक्रेते यांच्याकडे कोरोना तपासणीचा अहवाल नसल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या हातगाड्या बंद करण्यात आल्या. तसेच यापुढे भाजी विक्रेत्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून घ्यावे व चाचणी केल्याशिवाय भाजी व फळ विकू नये, असा आदेश बजावण्यात आला.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे नियोजन करा : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
हेही वाचा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरच्या ग्रामीण भागात कडक निर्बंध