सोलापूर - विडी वळणे हे काम 95 टक्के ‘वर्क फ्रॉम होम’ आहे. तातडीने विडी कारखाने चालू करून विडी कामगारांच्या हाताला काम द्या. ही मागणी घेऊन माजी आमदार नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागणी मान्य न झाल्यास पोटाची खळगी व रोजगारासाठी हजारो विडी कामगार महिला रस्त्यावरची तीव्र लढाई करणार, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे आडम यांनी दिला. हे धरणे आंदोलन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे (सिटू) महासचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
... महिला विडी कामगारांना 'वर्क फ्रॉम होम' का नाही
कोरोना रोखण्यासाठी सरकारने सर्व आस्थापना आणि खासगी कंपन्या, अन्य उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून रोजगार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने विडी उद्योग हे 95 टक्के घरगुती उद्योग आहे. अर्थातच ‘वर्क फ्रॉम होम’ असून त्यांना कच्चा माल घेणे आणि पक्का माल देणे यासाठी लागणारा कालावधी काही मिनिटांचा आहे. तेही तीन दिवसआड अशा पद्धतीने कारखानदारांचे नियोजन आहे. त्यासाठी ते कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपायांची अमलबजावणी करण्याची तयारीही शासनापुढे दर्शविली आहे. राज्य सरकारने या विषयी तातडीने निर्णय घेऊन विडी कामगारांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची मुभा द्यावी, अशा आशयाचे निवेदन नगरसेविका कामिनी आडम आणि माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी सोलापूर महापालिका आयुक्त शिवशंकर यांना दिले.
'ब्रेक द चैन' अंतर्गत उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला
माजी आमदार आडम म्हणाले, राज्यात 3 ते साडेतीन लाख विडी कामगार आहेत. त्यापैकी सोलापूर शहरात 65 ते 70 हजार विडी व यंत्रमाग कामगार आहेत. हे सर्व कामगार व त्यांचे कुटुंबीय पूर्णपणे त्याच उत्पन्नांवरच अवलंबून आहे. राज्यात ब्रेक द चैनमुळे कडक निर्बंध लागूनझाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांना कारखानदारांकडून काही रक्कम मिळावी म्हणून सोलापूर शहरात प्रयत्न झाले. बहुसंख्य कामगारांना एक हजार रुपये मिळाले. मात्र, ही रक्कम आजच्या वाढत्या महागाईच्या काळात नाममात्र आहे.
हेही वाचा - उजनीच्या पाण्यासाठी रक्त सांडू, पण पाणी जाऊ देणार नाही