सोलापूर - शेतकऱ्यांचे नावे परस्पर कोट्यवधी रुपयांची कर्ज प्रकरणे काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक यांना भेटून साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून बुधवारी (आज) बार्शी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरी येथील बबनरावजी शिंदे शुगर आलायड इंडस्ट्रीज लि.या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे नावे जवळपास 60 कोटी रुपयांची परस्पर कर्ज काढली असल्याची माहिती समोर आली आहे. हे कर्ज 112 शेतकऱ्यांच्या नावे ही कर्जे मंजूर झाली आहेत. बार्शी येथील बँक ऑफ इंडिया या शाखेने ही कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. साखर कारखान्याच्या संचालकांनी व बँकेच्या अधिकाऱ्यांनी ही संगनमत करून कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत, असा आरोप शेतकरी करत आहेत. मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावातील 112 शेतकऱ्यांना ज्यावेळी बँकेच्या नोटीस आल्या त्यावेळी खरी वस्तुस्थिती समोर आली.
शेतकऱ्यांनी माहिती देताना सांगितले, की आम्ही कधीच बार्शी येथील बँक ऑफ इंडिया बँकेत गेलो नाही तर आमच्या नावे कर्ज कशी मंजूर होतात. घोटाळे करणाऱ्यांनी आमच्या शेताचे ऑनलाईन उतारे काढले, तलाठ्यांच्या बनावट शिक्का तयार करून, बनावट सह्या करून ही कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची सीबील स्कोर खराब झाले आहेत. तसेच त्यांच्या नावे कर्ज प्रकरण थकीत दिसत असल्याने त्यांना कर्ज माफीचा लाभ घेता येत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
या गावातील शेतकऱ्यांच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे
नरखेड (ता मोहोळ), पंढरपूर, मगरवाडी, माढा तालुक्यातील म्हैसगाव, वडशिंगे, उपळाई बुदृक, केवड, निमगाव, वाकाव, तांदूळवाडी, बार्शी तालुक्यातील बार्शी शहर, बाभळगाव, साकत, कांदलगाव, यावली, कासारवाडी.