सोलापूर - विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. माझ्यावर गोळ्या घातल्या तरी माझा आवाज बंद होणार नाही, अशा तीव्र शब्दात आमदार गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली. सोलापुरात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी पडळकरांच्या अध्यक्षतेखाली घोंगडी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. मड्डी वस्ती येथील बैठकीच्या ठिकाणी त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले होते.
भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोर झाला हल्ला
भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी जाताना गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीमुळे गोंधळ उडाला होता. कार्यकर्ते व पदाधिकारी हे गोपीचंद पडळकर यांच्या वाहना जवळ आले आणि सुरक्षाकडे बांधून थांबले.
पवारांच्या नेतृत्वाखाली चालते गुंडगिरी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार, अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. दिवसभर सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत चर्चा सुरू होती. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पडळकरांचा दिवसभर सोलापूर दौरा आयोजित होता. शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी घोंगडी बैठका आयोजित केल्या होत्या. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाताना हा हल्ला झाला. दोन व्यक्ती एका मोपेडवर आले आणि दगडफेक करून निघून गेले. यानंतर गोपीचंद पडळकर शासकीय विश्रामगृहात आले. त्यावेळी त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर टीका करत पवार यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी चालते, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
पडळकर यांना झाली नाही कोणतीही इजा
या हल्ल्यात आमदार गोपीचंद पडळकर यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा जखम झाली नाही. माझ्या चाहत्यांनी काळजी करू नये, असे आवाहन केले आहे.
पत्रकार परिषदेत पडळकर यांनी केली होती पवारांवर टीका
मी लहानपणापासून ऐकत आहे, शरद पवार पंतप्रधान होणार आहेत. मात्र, गेल्या तीस वर्षांपासून शरद पवार देशाचे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे तीन-चार खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांचे पक्ष नाही. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. रात्र गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात! त्यामुळे पुढे कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा करत दिल्ली येथे तिसऱ्या आघाडीबाबत बैठक झाली असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. तसेच कोंबड्याला वाटते मी उठल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे अनेक कोंबडे एकत्र येत दिल्लीत बैठक पार पडली असल्याची बोचरी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि दिल्ली येथे झालेल्या बैठकीवर सकाळी पत्रकार परिषदेत केली होती.
हेही वाचा - रात्र गेली हिशोबात! पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका