सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात भव्यदिव्य असा शिवजागर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या माता-माऊलींच्या उपस्थितीत राज्यातला सर्वात देखणा सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा कौतुक सोहळा पाळणा गाऊन उत्साहात करण्यात आला.
रात्री अकरा वाजल्यापासून सर्वधर्मीय, सर्वजातीय हजारो महिला पारंपरिक वेशात छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाल्या. त्यानंतर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याशेजारी राजमाता जिजाऊंचा पुतळा ठेवण्यात आला. या पुतळ्याच्या अगदी समोर सजविण्यात आलेला पाळणा बांधण्यात आला होता. त्यात बालशिवबाची मूर्ती ठेवण्यात आली. बरोबर 11.45 वाजता वीरमाता आणि वीरपत्नींचा गौरव करण्यात आला अन् त्यानंतर...
झुलवा पाळणा...पाळणा बाळ शिवाजीचा...
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा....
हे पाळणा गीत गात शिवजन्मोत्सवाचा पाळणा सादर करण्यात आला. आतषबाजी आणि शिव जय जयकारांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
या सोहळ्याला मुस्लीम महिला आणि तरुणींनीही मोठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एका जातीचे नव्हते, तर ते सर्व रयतेचे राजे होते. त्यांनी मुस्लिमांचा आणि पवित्र ग्रंथ 'कुराण'चाही सन्मान केला. आता राजकीय लोक समाजात दुफळी निर्माण करत आहेत. पण आपण सर्व भारतीय एकोप्यानं राहू, असे मत मुस्लीम भगिनी रेश्मा मुल्ला यांनी मांडले. यावरून शिवाजी महाराज सर्वव्यापी असल्याचेच पाहायला मिळाले.
हेही वाचा - किल्ले शिवनेरी गडावर ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सव; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
हेही वाचा - उस्मानाबादेत रोपांपासून साकारली 'शिवप्रतिमा'