पंढरपूर - पंढरपूर तहसील कार्यालयासमोर शिवसेना, काँग्रेसच्यावतीने पेट्रोल दरवाढीविरोधात बैलगाडी, घोडागाडी आणत आंदोलन केले. असंख्य शिवसैनिकानी मोटर सायकल ढकलत दे धक्का आंदोलनही केले. तर, शिवसेना महिला आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर चूल मांडून भाकरी थापत वाढलेल्या गॅस दराचा निषेध केला.
पंतप्रधान मोदी यांना चुलीवरील भाकरी पाठवली
पंढरपूर तालुक्यातील शिवसेना व महिला आघाडीकडून केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीविरोधात छत्रपती शिवाजी चौक ते तहसील कार्यालयातील गेट समोर बैलगाडी, घोडागाडी, मोटरसायकल ढकलताना इंधन दरवाढीविरोधात रैली काढून निषेध केला. यावेळी शिवसैनिकांकडून मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना महिला आघाडी तहसील कार्यालयाच्या गेटसमोर चूल मांडून केंद्र सरकारचा निषेध करत भाकरी थापण्यात आल्या. शिवसेनेकडून तहसील अधिकाऱ्यांना निवेदन देताना थापलेली भाकरी पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात आली आहे.
केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी
सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले, पंढरपूर येथील शिवाजी चौकापासून टू व्हीलर गाडी बैलगाडीमध्ये ठेवून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात रॅली काढण्यात आली. तसेच महिला आघाडीने चूल पेटवून गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लवकरात लवकर इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी त्यांनी आली.
सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे म्हणल्या की, शिवसेनेच्यावतीने इंधन दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलन केले जात आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यामुळे राज्यातील महिला भगिनींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने एकीकडे मोफत गॅस वाटप करत आहे, तर दुसरीकडे दरवाढ करून महिलांना आर्थिक भार देतात. याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीकडून चुलीवरील भाकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला.