करमाळा(सोलापूर) - अहमदनगर, बीड आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात थैमान घातलेल्या नरभक्षक बिबट्याला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी निशाणा करत ठार केले आहे. वांगी नं.चार रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती. या बिबट्याने अहमदनगर, बीड, सोलापूर जिल्ह्यात बारा जणांचा बळी घेतला होता.
मोहिते-पाटलांच्या गोळ्यांनी घेतला बिबट्याचा वेध
करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आले आहे. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या केळीच्या बागेमध्ये असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर पुणे व बारामती येथून आलेल्या शार्पशूटर यांनी केळीच्या बागेला वेढा घातला होता. या शार्पशूटर पथकामध्ये अकलूज येथील धवलसिंह मोहिते पाटील देखील सामील होते. केळीच्या बागेत बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर धवलसिहं यांनी पण पंधरा फुटावर असलेल्या नरभक्षक बिबट्याला गोळ्यांचे 3 फायर झाडत ठार केले.
करमाळ्यात तिघांचे बळी
नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात तीन व्यक्तींना ठार केले होते. फुंदेवादी येथील पुरुष, अंजनढोह येथील स्त्री आणि चिकलठाणा येथील 9 वर्षीय मुलगी असा तिघांचा बळी या बिबट्याच्या हल्ल्यात गेला होता.
अशी होती वन विभागाची तयारी
करमाळा येथील बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरे, सीसीटीव्ही कॅमेरे, शार्प शूटरही लावले होते. तीन वेळा या बिबट्याने शार्पशूटरना हुलकावणी दिली होती. उजनी काठ असलेल्या फळांच्या बागांमुळे बिबट्याने वन खात्याला सुमारे पंधरा दिवस हुलकावणी दिली होती. मात्र, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करून त्याला ठार केले.
अजूनही बिबट्या असल्यामुळे तालुक्यात संभ्रम
वांगी चार परिसरात नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर करमाळा तालुक्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे. मात्र, तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याचा धुमाकूळ यामुळे थांबणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. करमाळा तालुक्यामध्ये विविध परिसरात एका पेक्षा जास्त बिबट्या असल्याचा संशय वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला आहे. त्यामुळे एक बिबट्या ठार झाल्यानंतर दुसऱ्या बिबट्याबाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
31 जानेवारी 2021 पर्यंतच आदेश होता वैध
बिबट्याला जेरबंद, बेशुध्द करणे शक्य न झाल्यास अधिक मनुष्य हानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याची परवानगी देण्यात आली होती. ही कार्यवाही करण्यास मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) औरंगाबाद आणि मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे यांच्या आदेशाने कर्मचारी काम करतील, असे सांगितले होते. बिबट्याला मारण्याचा आदेश ३१ जानेवारी २०२१ पर्यंतच वैध राहणार होता. सर्व प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद किंवा बेशुध्द करण्याला प्राधान्य द्यावे. या बिबट्याला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पारितोषिक जाहिर करण्यात येऊ नये. बिबट्यास जेरबंद किंवा बेशुध्द करणे शक्य न झाल्यास त्याला ठार करण्याची योजना आखावी. यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम विभाग हे समन्वय अधिकारी राहतील, असेही सांगितले होते.
अवनीला घातल्या होत्या गोळ्या
यापूर्वी अनेक वेळा हिंसक प्राणी व मानवामध्ये संघर्ष झालेला आहे. यामध्ये अवनी ही वाघिण पहिली बळी ठरलेली आहे. अवनीने 13 जणांचे बळी घेतले होते. यामुळे स्थानिक लोक प्रचंड आक्रमक झाले होते. या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघिणीला शक्यतो जेरबंद करा किंवा अंतिम पर्याय म्हणून ठार मारा असे, आदेश तेव्हा काढावे लागले होते. ही घटना 2018 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात घडली होती. त्यानंतर या वाहिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. त्यासाठी हैदराबाद येथून विशेष शुटर बोलविण्यात आले होते. विशेष म्हणजे या वाहिणीला गोळ्या घातल्या तेव्हा तिला दोन लहान बछडेही होते.